IND vs ENG: पंतमुळे भारताचं याच नाही शेवटच्या कसोटीचंही गणित गडबडलं? टीम इंडियाकडे आता …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ आधीच अनेक दुखापतींचा सामना करत आहे. त्यात आता विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतच्या दुखापतीने संघाची चिंता आणखी वाढवली आहे. पहिल्या दिवशी खेळादरम्यान पंतला गंभीर दुखापत झाली असून त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या पायाला सूज आली होती आणि थोडं रक्तही दिसलं, ज्यामुळे त्याच्या पुढील खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पंतला कशी झाली दुखापत?
खेळाच्या 68व्या षटकात पंत 37 धावांवर फलंदाजी करत होता. तेव्हा क्रिस वोक्सच्या एका चेंडूवर त्याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागून थेट त्याच्या पायावर आदळला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केलं आणि नंतर रिव्ह्यूही घेतला, मात्र निर्णय नॉटआउट ठरला. यानंतर पंत मैदानातच कोसळला आणि त्याला तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. मात्र तो उभा राहू शकला नाही आणि अखेर त्याला स्ट्रेचरवरून बाहेर न्यावं लागलं.

साई सुदर्शनची अपडेट
दिवसअखेर झालेल्या पत्रकार परिषदेत साई सुदर्शनने पंतच्या दुखापतीबाबत अपडेट दिलं. तो म्हणाला, “पंत खूप वेदनेत होता. त्याने आज चांगली फलंदाजी केली होती. तो स्कॅनसाठी गेला आहे आणि त्याच्या दुखापतीबाबत अधिक माहिती सकाळपर्यंत मिळेल. जर तो खेळू शकला नाही, तर आम्हाला एका फलंदाजाशिवाय सामना खेळावा लागेल. त्यामुळे आमच्या अष्टपैलू खेळाडूंवर आणखी जबाबदारी येईल.”

टीम इंडियासमोर मोठं आव्हान
जर ऋषभ पंत पुढे फलंदाजीसाठी उतरू शकला नाही, तर भारतीय संघाला 9 फलंदाजांवरच अवलंबून रहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत सुदर्शन, अष्टपैलू खेळाडू आणि तळाच्या फलंदाजांवर जास्त जबाबदारी येईल. पंतचा फॉर्म आणि त्याचं मैदानातलं योगदान लक्षात घेता, ही टीम इंडियासाठी मोठी धक्कादायक बातमी ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *