महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी पुढील सहा महिन्यांसाठी आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे. भाविकांना २८ जुलैपासून नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महानैवेद्य पूजेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गुरुवारी (ता. २४) दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य आदी पूजांची पुढील सहा महिन्यांची नोंदणी सुरू होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होते. त्यासाठी मंदिर समितीने मागील वर्षांपासून पूजांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.
जुलै अखेर पर्यंतच्या नोंदणी केलेल्या सर्व पूजा पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट ते डिसेंबर या सहा महिन्यांसाठी पूजांची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. येत्या २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजांची नोंदणी करता येणार आहे. नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजांची नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून भाविकांनी पूजांची नोंदणी करावी.
यापूर्वी पहिल्या टप्प्यातील ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४, दुसऱ्या टप्प्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ तसेच तिस-या टप्प्यात १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती.
उत्सव, गर्दीचे दिवस वगळून पूजा
चौथ्या टप्प्यात १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा १ ते ३१ ऑगस्ट, २०२५ कालावधीतील तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांनी पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.