२४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। पुण्यातील खराडीमधील रेव्ह पार्टीत छापा टाकत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये रोहिणी खडसे यांच्या पतीचाही समावेश आहे. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले. आता २४ तासानंतर रोहिणी खडसे यांची याबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दोन ओळीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच, असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे.

रविवारी पहाटे खराडीमध्ये एका अलिशान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकली. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना गुन्हे शाखेने अटक केली. खडसेंच्या जावयाला अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून खडसेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. एकनाथ खडसे यांनी हे होणारच होते अशी प्रतिक्रिया दिली. जावई दोषी असेल तर शिक्षा व्हावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तर गिरीश महाजन यांच्याकडून खडसेंच्या वक्तव्याचा समाचार घेत जावई ट्रॅपमध्ये अडकणार माहिती होते, तर तुम्ही अलर्ट का केले नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

खराडीमधील ड्रग्ज प्रकरणाला २४ तास उलटून गेल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या आमदार रोहिणी खडसे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून दिला. “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र!” अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली. रोहिणी खडसे यांच्या पोस्टवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते आवाज दाबण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर काहींनी हे काही नवीन नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे सांगायला ताईंना २४ तास लागले, असा खोचक टोला एका युजर्सने लगावला.

खराडीत पोलिसांना काय काय मिळाले?
खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी दोन कार, कोकेन, अमली पदार्थ, हुक्का पॉट असा एकूण ४१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थ प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *