महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। सध्या सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला मेट्रो धावत होती. आता गुरुवार (दि. 15) पासून मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला धावणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. विनागर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
सद्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून 490 फेर्यांव्दारे मेट्रोसेवा पुरवत आहे. दर 6 मिनिटाला ट्रेन सेवा यामुळे अधिक 64 फेर्या वाढणार आहे. पंधरा ऑगस्टपासून एकूण फेर्या 554 वाढणार आहे. अधिकच्या 64 फेर्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. (Latest Pimpri News)
दर 6 मिनिटाला ट्रेन चालवण्यास मेट्रो दोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर 15 ऑगस्टपासून दर 6 मिनिटाला सेवा हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुलै महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 92 हजारपर्यंत वाढली. ऑगस्टमध्ये प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आजपर्यंत प्रवाशांची सरासरी संख्या 2लाख 13 हजार 620 निदर्शनास आली आहे. पिंपरी मेट्रो स्टेशनवर प्रवासी संख्या विक्रमी आहे. त्यामुळे महामेट्रोस सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.
याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, मेट्रोच्या प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मेट्रोने दैनंदिन मेट्रोच्या फेर्यांमध्ये वाढ केली आहे. आता दर सहा मिनिटाला ट्रेनसेवा ही पुरवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून 490 ऐवजी 554 फेर्या होणार आहेत.