महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिती आणि पालघर यासारख्या जिल्ह्यांमध्ये 21 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती असणार आहे. 
मुंबईसह कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबईसह कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. राज्यात 21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट आहे. विदर्भात चंद्रपूर,गडचिरोली आणि यवतमाळ पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तिकडे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. विजेच्या कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. तसंच समुद्र खवळलेली स्थितीत असणार असल्यानं मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
१६-२१ ऑगस्ट २०२५ दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील हवामानाची शक्यता आहे:
या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 16, 2025
पुण्यात मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात अतिमुसळधार पावसाची इशारा दिला आहे. ज्यामुळे पूरस्थिती उद्भवू शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. IMD ने 19 ऑगस्ट पर्यंत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात कशी आहे परिस्थिती?
नागपूर आणि विदर्भात आज मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित व्यक्त करण्यात आला आहे. पावसासह वादळी वारे (24 किमी/तास) वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दक्षिण विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, ज्यासाठी IMD ने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात, विशेषत: औरंगाबाद, जालना आणि परभणीमध्ये आज जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात पावसामुळे नद्या आणि धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD नुसार, महाराष्ट्रात ऑगस्ट 2025 मध्ये सरासरी 307.5 मिमी पाऊस अपेक्षित असून आज काही ठिकाणी 7.9 मिमी ते 19.1 मिमी पाऊस पडण्याची अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील नद्या आणि धरणे यांना पूराचा धोका असून विशेषत: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.