महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑगस्ट ।। जना मास्तर चौक, मासेआळी, गंज पेठ, पुणे येथे पारंपरिक आणि सांस्कृतिक श्रीकृष्ण जन्मोत्सव (दहीहंडी) कार्यक्रमाचे आयोजन पतित पावन संघटनेतर्फे नियोजित होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा वापर करून २५ दिवस आधी अधिकृत परवाना मिळावा म्हणून सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. यामध्ये वाहतूक विभाग व पुणे महानगरपालिकेची ना-हरकत (NOC) पत्रे देखील संलग्न करण्यात आली होती.
परंतु, अत्यंत खेदजनक बाब म्हणजे – एका पोलीस अधिकाऱ्याने वैयक्तिक पूर्वग्रहदूषित भूमिकेतून या हिंदू धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला.
श्रीकृष्णालाही जन्मतः संघर्ष स्वीकारावा लागला होता, आणि पुढे त्यांनी संपूर्ण समाजाला न्याय व धर्माचा मार्ग दाखवला. त्याच प्रेरणेने आम्ही हा कार्यक्रम शांततेने आणि नियमांचे पालन करत साजरा करण्यास इच्छुक होतो. कार्यक्रमस्थळी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी लेखी स्वरूपात कोणतीही हरकत नाही असे नमूद केले असतानाही, संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत हा कार्यक्रम थांबविण्याचा अडथळा निर्माण केला.
सदर अधिकाऱ्याची ही भूमिका केवळ एका धार्मिक कार्यक्रमाला विरोध करणारी नव्हती, तर संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिमेला गालबोट लावणारी ठरते. जे पोलीस अधिकारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात, त्याच खात्यातील एका व्यक्तीमुळे समाजात असंतोष निर्माण होतो हे दुःखद आहे.
“सरकार आपलं आहे, पण प्रशासन आपलं नाही” – ही भावना यामुळे पुन्हा एकदा प्रबळ झाली आहे.
या कार्यक्रमात वाजवण्यासाठी आलेले १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवक व युवती, पारंपरिक पोशाखात ढोल-ताशा वाजवण्यासाठी आले होते. परंतु त्यांनाही धमकी देण्यात आली की तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पारंपरिक वाद्य वाजवण्यास मज्जाव केला गेला. एवढेच नव्हे तर काही नागरिकांना शब्दांचा अवमानजनक वापर करून अपमानित करण्यात आले.
या वर्षीच्या दहीहंडीच्या देखाव्यासाठी ‘जय लहूजी’ या क्रांतिकारकाच्या नावाने देखावा लावण्यात येणार होता. पण तो देखावाही या अधिकाऱ्याने परवानगी नाकारून रोखला. समाजसुधारकांच्या नावाचा देखावा रोखणे हे केवळ सांस्कृतिक अन्याय नसून, इतिहासाच्या सन्मानाचा अपमान आहे.
आमची मागणी आणि इशारा:
पतित पावन संघटना ही संघर्षांची साक्ष देणारी संघटना आहे. आम्ही कायदा-सुव्यवस्थेचा मान राखणारे नागरिक आहोत. मात्र, धर्म, संस्कृती आणि युवाशक्तीवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही.
या प्रकाराबाबत आम्ही वरिष्ठ प्रशासन, माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवणार आहोत. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस कारवाई व्हावी, ही आमची ठाम मागणी आहे.
हिंदूंच्या पारंपरिक कार्यक्रमाला दिलेल्या विरोधाचे पडसाद हे केवळ पुण्यात नव्हे, तर महाराष्ट्रभर उमटतील. आम्ही शांततेच्या मार्गाने लढू, पण अन्याय सहन करणार नाही.
– स्वप्नील नाईक
अध्यक्ष, पतित पावन संघटना