महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। एखादा विद्यार्थी क्रिकेटचा सामना पाहत असेल आणि त्याला पुढचा चेंडू किती वेगाने टाकला जाईल, याचा अंदाज लावता येईल, तसेच रसायनशास्त्रात प्रयोग करताना औषधातील घटक काय परिणाम करेल, याचा अंदाज ‘एआय’च्या साहाय्याने बांधता येणार आहे.
वैशिष्ट्य काय? : swayam-plus.swayam2.ac.in या ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मवर ‘एआयसह क्रिकेट विश्लेषण’ या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना क्रिकेटचा आधार घेऊन डेटा समजून घेणे, त्याचे विश्लेषण आणि निकालांचा अंदाज लावणे शिकवले जाते.
प्रत्येक अभ्यासक्रम २५ ते ४५ तासांचा
विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वयम पोर्टलवर मोफत एआय अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.
या पोर्टलवरून ‘एआय’शी संबंधित विविध कोर्सेस विद्यार्थ्यांना मोफत शिकता येणार आहेत. हे अभ्यासक्रम ‘आयआयटी’ आणि ‘आयआयटीएम’ या सारख्या नामांकित संस्थांच्या तज्ज्ञांनी तयार केले आहेत.
या पोर्टलवर ‘पायथॉन’ वापरून ‘एआय-एमएल’ सारखा तांत्रिक अभ्यासक्रम आहे, ज्यात डेटा सायन्स, सांख्यिकी, रेषीय बीजगणित आणि प्रोग्रॅमिंग शिकवले जाते. प्रत्येक कोर्स २५ ते ४५ तासांचा असून, तो पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते.