महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। पुण्यात सोमवारी झालेल्या पावसाचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला पुण्यात खराब हवामानामुळे पुणे विमानतळावर उतरता आले नाही, या विमानाला हैदराबाद विमानतळावर उतरावे लागले तर पुण्याहून तीन उड्डाणांना सुमारे तीन तासांचा उशीर झाला. यात दिल्ली, जळगाव व जयपूरला जाणाऱ्या विमानाचा समावेश होता. विमानसेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पुण्यात सोमवारी दिवसभर खराब हवामान व पाऊस असल्याने सार्वजनिक वाहतुकीलादेखील काही प्रमाणात फटका बसला. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या एसटीच्या ‘शिवनेरी’ बससेवा देखील विस्कळित झाली. शिवनेरीला स्वारगेट गाठण्यासाठी सुमारे एक तासाचा उशीर झाला. याला मुंबईतील पाऊस कारणीभूत आहे. तसेच पावसामुळे पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरु होती. सोमवारी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला फटका बसला. रेल्वेच्या सेवेवर मात्र कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या विमानांना फटका
दिल्लीहून पुण्याला येणारे इंडिगोचे विमान (६ इ -५३८७) हे दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पुणे विमानतळावर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र खराब हवामानामुळे हैदराबाद विमानतळावर उतरले.
पुण्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान (६ इ -२२८५) हे विमान दुपारी २ वाजून ५ मिनिटाने दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र ४ वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण केले.
पुणे – जळगाव (आयसी – ५६०६) हे विमान दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले.
पुणे – जयपूर (एसजी – १०८०) हे विमान पुण्याहून ५ वाजून ३० मिनिटांनी उड्डाण करणार होते. प्रत्यक्षात मात्र ९ वाजून १० मिनिटांनी उड्डाण झाले.