वोटिंग मशिन चुकीचे, महाग अन् वादग्रस्त; वॉटरमार्क पेपरवर मतदान घेणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।।अमेरिकेत मतदानासाठी पोस्ट आणि वोटिंग मशिनचा वापर बंद करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटलं की, मेल आणि वोटिंग मशिनद्वारे केलं जाणारं मतदान बंद करण्यासाठी एका आंदोलनाची सुरुवात करणार आहे. वोटिंग मशिन चुकीचे आणि वादग्रस्त असल्याचंही ते म्हणाले. वोटिंग मशिन आणि पोस्टाद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानापासून सुटका व्हावी यासाठी २०२६च्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी एक आदेश मंजूर करेन असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एका पोस्टमध्ये ही घोषणा केली. त्यात म्हटलं की, पोस्टाद्वारे पाठवल्या जाणाऱ्या मतपत्रिकांपासून सुटका व्हावी यासाठी एक आंदोलन सुरू करत आहे. या दिशेने काम करतच आहोत तर चुकीच्या, महागड्या आणि वादग्रस्त अशा वोटिंग मशिन्सपासूनही सुटका करणार आहे. या मशिनचा खर्च हा वॉटरमार्क पेपरपेक्षा दहापट जास्त आहे. वॉटरमार्क पेपर वोटिंग मशिनपेक्षा वेगवान आहे आणि त्याचा निकाल खूप अचूक असतो. कोण जिंकलं आणि कोण हरलं याबाबत कोणतीही शंका राहत नाही असंही ट्रम्प म्हणाले.

वॉटरमार्क पेपरबाबत ट्रम्प यांनी जोरदार बाजू मांडली. निवडणुकीत वेगवान आणि अधिक विश्वासार्ह निकालासाठी फक्त वॉटरमार्क पेपरचाच वापर करायला हवा असं ठाम मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं. निवडणुकीत डेमोक्रेट्सवर फसवणुकीचा आरोप करत ट्रम्प यांनी म्हटलं की, निवडणूक प्रक्रियेत सत्य आणि प्रामाणिकपणा परत आणण्यासाठी ताकदीनिशी लढेन. आता आपण जगातला एकमेव देश आहे जो मेल इन वोटिंगचा वापर करतो. इतर सर्व देशांनी मोठ्या प्रमाणावर फसवणुकीमुळे हे बंद केलंय.

एका कार्यकारी आदेशावर सही करून २०२६च्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी पोस्टल मतदान आणि वोटिंग मशिन हद्दपार करण्यात येतील असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले. डेमोक्रेट्सकडून याला विरोध केला जातोय कारण ते या माध्यमातून फसवणूक करतायत असा आऱोपही ट्रम्प यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *