Red Alert Pune: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’; महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। पुणे शहरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णतः सतर्क झाला आहे. मुसळधार पाऊस व धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नागरी भागावर परिणाम होऊ नये यासाठी महापालिकेने आवश्यक खबरदारी घेतली आहे.

शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन अशी एकूण 30 पथके तैनात करण्यात आली असून, आपत्ती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली. (Latest Pune News)

सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बाणेर, शंकरशेठ रस्ता, येरवडा येथील गुंजन टॉकीज परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या होत्या. महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन नाले व ड्रेनेज स्वच्छ करून पाणी काढण्याची कामे केली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारींचीही तातडीने दखल घेण्यात आली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकार्‍यांशी संवाद साधून आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या. ड्रेनेज विभाग, पोलिस व जलसंपदा विभागाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम
हवामान विभाग व सी-डॅक यांनी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. सध्या जास्त पाऊस घाटमाथा परिसरात होत असला तरी, धरणातून विसर्ग सुरू झाल्यास त्याचा परिणाम शहरात जाणवू शकतो. अशा स्थितीत नागरिकांवर परिणाम होऊ नये यासाठी महापालिका व संबंधित विभाग सतत संपर्कात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी स्पष्ट केले.

पुरेशी साधनसामग्री उपलब्ध
आपत्ती निवारणासाठी बचाव पथकांना आवश्यक साहित्य व साधनसामग्री पुरविण्यात आली आहे. महापालिकेचे अधिकारी या पथकांवर लक्ष ठेवून आहेत. पावसाचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही सोनुने यांनी सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *