E-POS machine: राज्यात जुन्या ई-पॉस मशीनवरुन खतांची खरेदी-विक्री होणार बंद; 20 ऑगस्टनंतर वापर नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। राज्यात 2017 पासून एलओ सिक्युरिटी कोडद्वारे कार्यरत असलेल्या ई-पॉस या जुन्या मशीनवरून खतांची खरेदी-विक्री उद्या बुधवार (दि. 20 ऑगस्ट) पासून बंद होणार आहे. त्याऐवजी एल वन सुरक्षा प्रमाणपत्र असलेल्या नवीन पॉस मशीन आधार तथा यूआयडीएआयच्या मानकांप्रमाणे स्थापित करून कार्यान्वित करण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या खत विभागाने राज्यांना दिल्या आहेत. तशी माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी यांनी दिली.

कृषी आयुक्तालयाने सर्व उत्पादक खत कंपन्यांना एलवन पॉस मशीन पुरवण्यासाठी जिल्हानिहाय खत विक्रेत्यांची यादी उपलब्ध करून दिलेली आहे. आता केंद्र सरकारच्या खत विभागाकडील 14 ऑगस्ट 2025 च्या पत्रांन्वये एलवन पॉस मशीन कार्यान्वित करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2025 ही निश्चित केली आहे.

त्यानुसार 20 ऑगस्टपर्यंत राज्यातील ज्या खत विक्रेत्यांकडे एलवन पॉस मशीन स्थापित केलेली नसतील, अशा खत विक्रेत्यांना 20 ऑगस्टनंतर केंद्र सरकारच्या इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टिमवर (आयएफएमएस) खतांची खरेदी-विक्री करता येणार नाही. नवीन एलवन पॉस मशीन या खत कंपन्यांकडून मोफत दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही किरनळ्ळी यांनी केले आहे.

राज्याकडून 35 हजार पॉस मशीनची मागणी
राज्यात 35 हजार एलवन पॉस मशीनची मागणी कृषी विभागाने केलेली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 34 हजार 436 पॉस मशीन प्राप्त झाल्या आहेत. परवानाधारक खतविक्रेत्यांची संख्या 35 हजार इतकी आहे. प्राप्त पॉस मशीनपैकी सुमारे 28 हजार 600 मशीनचा पुरवठा खत विक्रेत्यांना कंपन्यांनी केलेला आहे. ज्या खतविक्रेत्यांनी अद्याप नवीन एलवन पॉस मशीन घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ प्राप्त करून घ्यावी आणि 20 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *