महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। राज्यभरात पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार लोणावळा परिसरात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्व शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
लोणावळा परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आज दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून पूरस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. परिसरातील सर्व शाळा प्रशासनांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
दरम्यान दोन दिवस होणाऱ्या या मुसळधार पावसाने परिसरात पाणी साचले असून लोणावळा नगर परिषद व स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे; असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता पुढील निर्णय परिस्थितीच्या अनुषंगाने घेतले जातील.
भिमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस
भिमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने चास कमान धरणात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सह्याद्रीच्या कुशीतलं सर्वात मोठा असलेला चास कमान धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून जलाशय ओव्हर फ्लो झाला आहे. धरणाच्या तीन दरवाजातुन १० हजार क्युसेक्सने भिमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.