Rain: मुंबई-पुण्यात कोसळधार! रेल्वेसेवेला मोठा फटका, डेक्कन एक्स्प्रेससह अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द; वाचा लिस्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। मुंबईसह पुण्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला बसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. सतत पडणाऱ्या पावासमुळे मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पावसामुळे आता अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. तर काही लांबपल्ल्याच्या गाड्याच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मनिसला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. अचानक ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे तिकिट बुकिंग असलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच, पुणेमार्गे जाणाऱ्या अनेक ट्रेन आज पुणे किंवा पनवेलपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

तर, नागरकोईल- मुंबई सी एस एम टी एक्स्प्रेस आज पुण्यापर्यंत धावणार आहे. कोल्हापूरहून निघालेली कोयना एक्स्प्रेस देखील आज पुणे मुक्कामी असणार आहे. बंगळूर ते मुंबई उद्यान एक्स्प्रेस सुद्धा आज पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे या तिन्ही ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. त्यांना आता पुण्यातच थांबावे लागणार आहे. तर मडगाव सी एस एम टी एक्स्प्रेस आज पनवेलपर्यंत धावणार आहे. या ट्रेनमधील प्रवाशांना पनवेलमध्ये उतरून पुढील प्रवास करावा लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *