महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – दि. २ सप्टेंबर – पुणे – जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी Amazon आता लवकरच ड्रोनद्वारे सामानाची होम डिलिव्हरी करण्याची शक्यता आहे. ड्रोन डिलिव्हरीच्या दृष्टीकोनातून सोमवारी कंपनीने अजून एक पाऊल पुढे टाकलं. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) अॅमेझॉनला ड्रोनने पॅकेज डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना, “ड्रोनच्या वापरासाठी मिळालेली परवानगी एक महत्त्वाचं पाऊल असून अॅमेझॉनच्या सुरक्षित सर्व्हिसवर एफएएने विश्वास दाखवला आहे”, असं अॅमेझॉनने म्हटलं आहे. यासोबतच, अद्याप ड्रोनने सामान डिलिव्हरीची चाचणी सुरू असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. पण ड्रोनद्वारे डिलिव्हरी नेमकी कधीपर्यंत सुरू होईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.
तीन कंपन्यांना परवानगी :-
अॅमेझॉनला पार्ट 135 एअर कॅरियर प्रमाणपत्र मिळालं आहे. यामुळे कंपनी आपल्या प्राइम एअर ड्रोन्सचा वापर करु शकणार आहे. पार्ट 135 एअर कॅरियर प्रमाणपत्र मिळवणारी अॅमेझॉन तिसरी कंपनी आहे. यापूर्वी अल्फाबेटच्या विंग एव्हिएशन आणि युपीएस फ्लाइट फॉरवर्ड यांना हे प्रमाणपत्र मिळालं आहे.पण कोणत्याही कंपनीने अद्याप व्यापक स्तरावर ड्रोन डिलिव्हरीला सुरूवात केलेली नाही.
किती वजनापर्यंत सामान नेणार?
कंपनीने गेल्या वर्षी एका इलेक्ट्रिक हेक्सागॉन ड्रोनबाबत माहिती देताना, त्याद्वारे 5 पाउंड वजनापर्यंत सामान नेता येतं असं सांगितलं होतं. यामध्ये अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे की त्याच्या मार्गात येणाऱ्या अन्य वस्तूंना धडक होत नाही, असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅमेझॉन गेल्या काही वर्षांपासून ड्रोनद्वारे सामानाची डिलिव्हरी करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी 2013 मध्ये एका टीव्ही मुलाखतीत पाच वर्षांमध्ये त्यांची कंपनी ग्राहकांपर्यंत ड्रोनने सामान पोहोचवेल असं म्हटलं होतं. ड्रोनद्वारे तीस मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत सामानाची डिलिव्हरी करणं शक्य होणार आहे.