Tuljabhawani Darshan : आजपासून तुळजाभवानीचे दर्शन थेट चोपदार दरवाजातून सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे मागील २० दिवसांपासून धर्मदर्शन व देणगीदर्शन बंद ठेवण्यात आले होते. या काळात भाविकांना केवळ सामान्य दर्शनाचीच परवानगी होती. मात्र आता मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २१ ऑगस्टपासून धर्मदर्शन आणि देणगीदर्शन पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना अधिक जवळून आणि कमी वेळेत मूर्तीदर्शन करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सध्या मंदिराच्या गाभाऱ्यातील व सिंहगाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू असून, १ ऑगस्टपासून दुरुस्तीची पहिली टप्पा प्रक्रिया हाती घेण्यात आली. या कालावधीत म्हणजे १ ते १० ऑगस्ट दरम्यान मंदिरातील धर्मदर्शन व देणगीदर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मात्र अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्याने मंदिर प्रशासनाने अजून दहा दिवसांसाठी दर्शनबंदी वाढवली होती. त्यामुळे या काळात भाविकांना केवळ सामान्य दर्शनाचीच परवानगी देण्यात आली होती.

चोपदार दरवाजातून कमी वेळेत दर्शनाची सोय
श्री तुळजाभवानी मंदिरातील धर्मदर्शन व पेड दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याने भाविकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. गाभाऱ्यातील आवश्यक जीर्णोद्धाराची कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने मंदिर संस्थानला दिल्यानंतर, २१ ऑगस्टपासून दर्शनाची विशेष सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे. यामुळे भाविकांना आता चोपदार दरवाजापासून कमी वेळेत आणि जवळून दर्शन घेण्याची सोय होणार आहे. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे हजारो भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना समाधान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *