महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये फक्त देशातूनच नाही, तर परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. तसेच गणेश मंडपांची आकर्षक सजावट आणि देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गावरील स्थानके – जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या दरम्यान पुणे मेट्रो सुरु झाली आहे. या पाच मेट्रो स्थानकांच्या आसपास शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. वाहतूक कोंडी टाळून मेट्रोमार्गे गणेशोत्सवाच्या मुख्य ठिकाणी भाविकांना पोहोचता येणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०२५ सकाळी ६ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर २०२५ रात्री ११ वाजेपर्यंत ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरु राहणार आहे.
गणेश चतुर्थीपासून ते पुढचे दोन दिवस म्हणजे २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरु राहील. तर ३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ या काळात मेट्रो नियमित वेळापत्रकानुसार रात्री उशिरापर्यंत धावेल.
पुणे मेट्रो वेळापत्रक
२७/०८/२०२५ ते २९/०८/२०२५ → सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा
३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ → सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सेवा
अनंत चतुर्दशी – ०६/०९/२०२५ → सकाळी ६ पासून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत, एकूण ४१ तास अखंड सेवा
त्यानंतर ०८/०९/२०२५ पासून मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहील.