महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। पुण्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगावच्या सरपंचांनी तालुक्यात तब्बल १७ हजारांहून अझिक बोगस मतदार असल्याचा दावा केला आहे. याबाबतचे पुरावे देखील त्यांनी सादर केले आहेत. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. निरनिम गावात २०० पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
बोगस मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांत मतदान केल्याचा आरोप देखील प्रताप पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली आहे. त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी म्हटले आहे.
इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातील ७८ मतदार बोगस असल्याचे आदेश दिले होते. पण श्रीकांत पाटील यांच्या बदलीपूर्वी आदेशावर सही होऊ शकली नाही. नवीन तहसीलदार जीवन बनसोडे हे या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करत आहेत, असा आरोप प्रताप पाटील यांनी केला आहे. कोर्टात याचिका दाखल केल्याने या प्रकरणाची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा पाटील यांना आहे.