महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्यास सुरुवात केली असून, राज्याच्या बहुतांश भागांत आज जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीपासून ते घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, या भागांत मुसळधार सरींसह समुद्रातही उधाण येण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भाग, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसर आणि परिसरातील इतर डोंगराळ भागांत देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज विजांसह पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व भागांत हवामान विभागाने सतर्कतेचा पिवळा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात अंशतः ढगाळ हवामान राहील आणि अधूनमधून हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. सोमवारी देखील राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहून पावसाच्या सरीमागून सरी सुरू होत्या. गेल्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील दमट वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील भागांत ढगांची दाटी वाढत असून, वातावरणातील दमटपणामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.