Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल ! हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानात …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आज आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल झालं आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव एकवटणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईत आलेल्या मराठ्यांना मुंबईच्या वेशीवरूनच परत जावं लागलं होत. मात्र आज मुंबईतील आझाद मैदानावर आज मराठ्यांचं भगवं वादळं धडकलं आहे. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज एल्गार करणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले आहेत. मराठ्यांचं हे वादळ २७ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून हजारोंच्या संख्येने निघालं होतं.

त्यानंतर काल म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी सकाळी जुन्नर येथे विश्रांती घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. आज हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मराठ्यांची फौज मुंबईत दाखल होताच फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली आहे. आझाद मैदान, आसपासचे प्रमुख रस्ते तसेच रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

वाहतुकीवरही परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारची गडबड किंवा अनुचित घटना घडू नये म्हणून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान आज मराठ्यांच्या मागणीची पूर्तता होणार का ? दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला न्याय मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आज संध्याकाळपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट होईल आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणता कलाटणीबिंदू मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *