Maratha Aarakshan: मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल, वाहतुकीत बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मुंबईत दाखल झाले आहेत. येथे आझाद मैदानात एक दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे जरांगेंनी न्याय मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान मुंबईत एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या मोर्चामुळे पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम असणार आहे. जरी शुक्रवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू होणार असले तरी, राज्यभरातून समर्थक आंदोलनकर्ते गुरूवारपासूनच आझाद मैदानावर जमू लागले होते.

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुमारे १५०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त आझाद मैदान परिसरात तैनात केला आहे. यामध्ये 450 अधिकारी-कर्मचारी, दोन एसआरपीएफ कंपन्या, बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून कडेकोट नजर ठेवली जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून तब्बल २० हजारांहून अधिक निदर्शक दक्षिण मुंबईत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त, आंदोलन स्थळ आणि त्याच्या आसपासच्या भागात केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जलद कृती दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि महाराष्ट्र सुरक्षा दल यांची प्रत्येकी एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना सांगितले की, मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्यक्तीशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांचा पुढे काही निरोप आला नाही. मग मी तो विषय घेतला नाही. कालही नगरमध्ये भेटावे, असे नियोजन होते. मात्र, ते मुंबईला जाण्याबाबत ठाम होते. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू. मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ते आंदोलन करत आहेेत याचे कौतुकच आहे. त्यांच्या मागण्या ते सार्थपणे मांडत आहेत. उदय सामंत यांच्याशी काल बोलणे झाले होते, उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होत आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार आहोत. समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल, असे देखील विखे पाटलांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. 2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा… 13 महिन्यांपासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे.

3. सगेसोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे, त्याचे सगेसोयरे घ्या…सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

वाहतुकीत बदल
वाहतूक विभागाच्या हद्दीत दि.२९/०८/२०२५ रोजी संभवतः आयोजक श्री. मनोज जरांगे यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेला असुन सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथे दि.२९/०८/२०२५ रोजी येणार आहे. सदरचा मोर्चा हा बीड येथून निघून नवी मुंबई मार्गे सायन- पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेवून आझाद मैदान येथे जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *