महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निवृत्तीची कोणतीही व्यवस्था नाही. आम्ही स्वयंसेवक आहोत. मला किंवा इतर कुणालाही निवृत्त होण्याची गरज नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मी स्वत: निवृत्त होणार नाही आणि मी कधीही कुणाला निवृत्त होण्याबाबत सांगितले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला 75 वा वाढदिवस आहे. अलीकडच्या काळात विरोधकांनी मोदींच्या निवृत्तीबाबत शरसंधान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी मोदी यांचे नाव न घेता फेटाळून लावलेल्या निवृत्तीच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत भागवत यांनी भाजप अध्यक्षांच्या निवडीपासून ते लोकसंख्या धोरण, आरक्षणाचे समर्थन, जातीयवाद आणि शिक्षण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
तीन अपत्ये जन्माला घाला
ते म्हणाले, प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबात तीन मुले असावीत यावर भर दिला पाहिजे, असे सांगत त्यांनी लोकसंख्येबाबतही भाष्य केले.
भाजप-संघात मतभेद नाहीत
भाजप अध्यक्षांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या गोंधळाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी आपले मौन सोडले. ते म्हणाले, जर भाजप अध्यक्ष निवडण्याचा निर्णय संघाने घेतला असता तर इतका वेळ लागला नसता. संघ आणि भाजपमध्ये मतभेद असू शकतात. परंतु कोणतेही वैर नाही. संघ फक्त सल्ला देतो, भाजप स्वतः निर्णय घेते, असेही त्यांनी स्पष्ट केले.