![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २२ जानेवारी | पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे शहर म्हणून ओळखले जाते; मात्र आज त्याच शहराचे रस्ते मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. गेल्या तीन वर्षांत पुण्यात तब्बल ११० ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित झाले, ही बाब केवळ आकडेवारी नसून ती प्रशासन, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या शिस्तीवर केलेली गंभीर टिप्पणी आहे. वाढता वेग, वाढती वाहने आणि घटती जबाबदारी—या त्रिसूत्रीमुळे अपघात हे नित्याचे झाले आहेत. महामार्ग असोत वा शहरातील चौक, प्रत्येक ठिकाणी जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. पुणे–सोलापूर, पुणे–सातारा, पुणे–नगर रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे वास्तव धक्कादायक आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते रुंद झाले, पण सुरक्षिततेचा विचार मात्र अरुंदच राहिला.
कात्रज ते मंतरवाडी हा रस्ता म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत नमुना आहे. खडी मशिन चौक, पिसोळी, उंड्री परिसरात अवजड वाहनांची सततची वर्दळ, अरुंद रस्ते, तीव्र उतार आणि अतिक्रमणांनी परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. रात्री पथदिवे बंद, अपुरी सिग्नल व्यवस्था आणि वाहतूक नियमनाचा अभाव यामुळे अपघात अटळ ठरत आहेत. चौक मोठा आहे, पण नियोजन खुजे आहे. चारही बाजूंनी वाहने धावत असताना नियंत्रणासाठी पुरेसे पोलिस नाहीत, वॉर्डन नाहीत, समन्वय नाही. परिणामी, नियम पायदळी तुडवले जातात आणि त्याची किंमत सामान्य नागरिकांना जीव देऊन मोजावी लागते. पुणे–सोलापूर रस्त्यावर तीन वर्षांत ११ जणांचा मृत्यू ही केवळ संख्या नाही, तर ती व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेली काळी मोहोर आहे.
अपघात हे “दैवावर” ढकलून चालणार नाहीत. रस्ते अपघात हे मानवनिर्मित संकट आहे—आणि त्यावर उपायही मानवनिर्मितच असले पाहिजेत. चौकांची पुनर्रचना, स्पष्ट रस्ते चिन्हे, प्रभावी सिग्नल व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि पुरेशी प्रकाशयोजना या मूलभूत गोष्टी आजही अपुऱ्या आहेत, ही शोकांतिका आहे. प्रशासनाने मोहिमा राबवल्या, कारवाई केली, हे स्वागतार्ह असले तरी ते पुरेसे नाही. नागरिकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वेगावर नियंत्रण, मद्यधुंद वाहनचालना टाळणे, नियमांचे पालन—हे केवळ कायद्याचे नव्हे तर जीवनाचे नियम आहेत. पुणे सुरक्षित करायचे असेल, तर रस्ते केवळ वाहतुकीसाठी नव्हे, तर माणसांसाठी आहेत, ही जाणीव प्रशासन आणि नागरिकांनी समानपणे स्वीकारली, तरच मृत्यूमार्गांचे रूपांतर जीवनमार्गात होऊ शकेल.
शिस्त पाळणे गरजेचे
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, ‘ब्लॅक स्पॉट्स’वर चौकांची पुनर्रचना, सिग्नल सुधारणा, वेगमर्यादा नियंत्रण, रस्ते चिन्ह, प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेख आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी शिस्त पाळणे गरजेचे आहे.
शहर वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून या ‘ब्लॅक स्पॉट’वर अभियांत्रिकी सुधारणा करण्यात येत आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, विशेषत: ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे
