Ganpati Visarjan 2025 : पुण्यात गौरी-गणपतीला निरोप ; लाडक्या बाप्पाला अश्रूंनी निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा दुमदुमणारा जयघोष, कुठे ढोल-ताशांच्या तालावर, तर कुठे साउंडवरील गाण्यांवर मनसोक्त नृत्य करत सातव्या दिवसाच्या गणपती व गौरींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत महिला, तरुणी व लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. गणरायाला निरोप देताना लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. शहराच्या विविध भागांत १८ हजार मूर्तींचे विसर्जन झाले, तर २२ हजार किलो निर्माल्य जमा झाले.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत मंगळवारी सकाळपासूनच सातव्या दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. नैवेद्य दाखवून दुपारी मूर्तींचे विसर्जन करण्यास सुरुवात केली. आपल्या कुटुंबासमवेत गौरी-गणपतीपुढे टाळ-मृदंगाचा गजर व गणरायाचा जयघोष करत निरोप दिला. श्रींच्या मूर्तीला निरोप देताना कुटुंबांमधील लहान मुले, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक विसर्जन घाटावर भावुक झाले होते.

घरगुती गणपतींसह काही मंडळे, संस्था, आस्थापना, सोसायट्यांच्या गणपतीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. ढोल-ताशा, बॅंड पथक, झांजपथकांसह भजनी मंडळांनीही काही मिरवणुकींमध्ये सहभाग घेत वातावरण भक्तिमय केले. काही घरगुती गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये परदेशी नागरिकांनीही सहभाग घेत गणरायाचा जयघोष केला.

बहुतांश नागरिक मूर्तीचे विसर्जन करत असतानाच, काही नागरिकांनी मूर्ती दान करण्यास प्राधान्य दिले. तब्बल २२ हजार ३१९ किलो निर्माल्य जमा शहरातील नदीकाठावरील विसर्जन घाटावर कृत्रिम हौद, विविध सार्वजनिक ठिकाणी लोखंडी पाण्याच्या टाक्‍यांची व्यवस्था केली होती. बांधलेल्या हौदामध्ये दोन हजार ११८, लोखंडी टाक्‍यांमध्ये १० हजार ९१८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर, पाच हजार ७३५ मूर्तींचे संकलन झाले. अशा एकूण १८ हजार ७७१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, २२ हजार ३१९ किलो निर्माल्य जमा झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह काही स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारीदेखील विसर्जनाच्या ठिकाणी कार्यरत होते. विसर्जन मिरवणूक गेल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तत्काळ रस्ते स्वच्छ करण्यास प्राधान्य दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *