महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०९ सप्टेंबर | गेल्या वर्षी सख्या बहिणीने वनराज आंदेकर यांच्या हत्येची सुपारी देत त्यांना संपवलं होतं. त्यानंतर आता आंदेकर गटाने कोमकर कुटुंबावर वार केला आणि गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा बळी घेतला.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत असतानाच त्याच्या मुलाला लक्ष्य करण्यात आलं. ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता क्लासवरून घरी परतणाऱ्या आयुषवर आंदेकर टोळीने गोळीबार केला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.
आयुषच्या पार्थिवावर काल (सोमवारी) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले, यावेळी त्याचा पिता गणेश कोमकर पॅरोलवर येऊन उपस्थित होता. मुलाचा मृतदेह पाहून गणेशने टाहो फोडला आणि वातावरण शोकाकुल झालं.
आयुषच्या अंत्यविधीला गणेश कोमकरला विशेष परवानगी देण्यात आली होती. नागपूर कारागृहातून पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला पुण्यात आणण्यात आलं.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर मोठी जबाबदारी असल्याने अंत्यसंस्कार तीन दिवसांनी पार पडले. स्मशानभूमीत भावंडे, नातेवाईक आणि कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला. गणेश आला तेव्हा स्मशानभूमी परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गणेशने मुलाचा मृतदेह पाहताच आक्रोश केला, “माझ्या मुलाची काय चूक होती?” असा सवाल त्याने केला. यावेळी त्याने आपल्या मुलाने पाठवलेलं “आय लव्ह यू पप्पा” असं लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड दाखवलं.
या कार्डात वडील-मुलाचे लहानपणापासूनचे फोटो होते. ते पाहून गणेश धायमोकलून रडला. नातेवाईकही हुंदके देऊ लागले आणि वातावरणात हळहळ दाटली.
“बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी,” असं म्हणत त्याने मुलाजवळ हंबरडा फोडला. “माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला,” अशा शब्दांत गणेशने पोलिसांसमोर हतबलता व्यक्त केली.
या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यात टोळीयुध्दाला सुरूवात झाली आहे.