महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे.
राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दिवसभरात तापमान वाढल्याचे चित्र दिसले. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात उघडिपीचे वातावरण राहील, परंतु अधूनमधून हलक्या सरींची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांतही अधूनमधून रिमझिम पाऊस सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक पासून, तमिळनाडू ते मान्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
हवामान तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.