महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर | Donald Trump Tariff News : (America) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कैक निर्णयांमधून ‘अमेरिका फर्स्ट’ असा नारा दिला. अमेरिकेतील स्थानिक आणि मूळ नागरिकांना सर्व क्षेत्रांमध्ये प्राधान्यस्थानी ठेवत त्याच अनुषंगानं देशाचा विकास करण्याचा त्यांचा हा अट्टहास आणि त्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेले अनेक निर्णय इतर देशांना भुर्दंड देणारे ठरले. प्राथमिक स्वरुपात ट्रम्प यांच्या या निर्णयांनी अमेकितेच फायदा दिसेल असं म्हटलं गेलं मात्र, आता हीच अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्याच निर्णयांची किंमत फेडताना दिसत आहे.
अमेरिकेत महागाईचा वणवा…
आर्थिक महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिका देशापुढं असणारी संकटं दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. फेडरल रिझर्व्हच्या असंख्य प्रयत्नांनंतरही अमेरिकेतील महागाई काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. ऑगस्ट महिन्यातील माहितीचा आधार घ्यायचा झाल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 2.9 टक्क्यांनी वाढ झाली असून, जुलै महिन्यात हा आकडे 2.7 टक्क्यांवर होता. लक्षणीय बाब म्हणजे जानेवारीनंतर यामध्ये सर्वाधिक वार्षिक वाढ होत गेल्याचं पाहायला मिळालं.
वाणसामान कायच्या काय महाग…
ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेत वाणसामानाच्या गोष्टींमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. USDA च्या अंदाजानुसार 2025 मध्ये एकूण ‘ग्रॉसरी’चे दर सरासरी 3.3 टक्क्यांनी वाढू शकतात. यामध्ये बीफ आणि अंड्यांच्या किमती महागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अमेरिकेमध्ये एक कुटुंब महिन्याला साधारण 900 अमेरिकी डॉलर अर्थात (75600 रुपये खर्च करतं). ही आकडेवारी येत्या काळात वाढू शकते. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे टॅरिफमुळे वस्तूंच्या किमती वाढणे (उदा. कपडे, वाहने), डेटा सेंटर्समुळे वीज महागाई आणि सेवा क्षेत्रातील मंदी यांचा समावेश आहे.
यंदाच्या वर्षी अमेरिकेत काही वस्तूंचे दर सातत्यानं वाढणार असून त्यात दूध, अंड, बीफ, विविध प्रकारचं मांस आणि इतरही खाद्यपदार्थांचा समावेश आहे. सध्या तिथं 1 डझन अंड्यांसाठी 3.59 $ म्हणजेच 300 रुपये मोजावे लागत आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात येत आहे. 1 पाऊंड (453 ग्रॅम) चिकनसाठी 2.08 $ म्हणजेच 175 रुपये मोजावे लागत असून यात 4.4 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर 1 पाऊंड बटाट्यांसाठी 84 रुपये, ब्रेडसाठी 155 रुपये साधारण 3 लीटर दुधासाठी 4.17 $ म्हणजेच 350 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे.
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरात येणाऱ्या किंबहुना स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंचे दर मोठ्या फरकानं वाढले असून, त्यात आणखी वाढ अपेक्षित असल्या कारणानं अमेरिकी नागरिकांनासुद्धा आता भविष्यातील वाढच्या महागाईनं घाम फोडला आहे. आता या परिस्थितीवर राष्ट्राध्य़क्ष ट्रम्प नेमका कसा तोडगा काढणार आणि नागरिकांना कसा दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.