महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर | आपल्या स्वप्नातलं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न काहीसं परवडणारं होणार आहे. यासंदर्भातील शुभ संकेत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं दिले आहेत. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या दर निश्चितीसंदर्भातील 56 बैठकीतील निर्णयाचा संदर्भ देत स्वस्त घरांची गुड न्यूज देण्यात आली आहे.
फायदे थेट ग्राहकांना
देशातील प्रमुख बांधकाम व विकासक संघटना ‘क्रेडाई’ने जीएसटी दरांमध्ये झालेल्या कपातीचा संदर्भ देत घरांचे दर कमी केले जाणार असल्याचे संकेत दिलेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील, अशी घोषणा ‘क्रेडाई’ने केली आहे. त्यामुळे देशातील घरे स्वस्त होणार आहेत. खरोखरच ग्राहकांना असा थेट लाभ देण्यात आला तर देशभरातील घरं स्वस्त होतील.
सध्या कशावर सुरु आहे विचार?
क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सर्वासामान्यांना दिलासा देणारी स्वस्त घरांची घोषणा केली. “कर कपातीमुळे होणाऱ्या खर्चातील बचतीचा किती भाग थेट ग्राहकांना पोहचवता येईल, यावर विकासक विचार करीत आहेत,” असं इराणी यांनी स्पष्ट केलं आहे.
जीएसटी परिषदेतील कोणत्या निर्णयाचा परिणाम झालाय?
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर रचनेत बदल केला आहे. त्यानुसार सिमेंटवरील जीएसटी कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर इतर बांधकाम साहित्यावरील जीएसटी करही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी कर रचना लागू झाल्यास बांधकाम साहित्यात घट होऊन बांधकाम शुल्क कमी होईल आणि घरे स्वस्त होतील अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीएटी परिषदेनंतरच व्यक्ती केली जात होती. आता यावर ‘क्रेडाई’ने शिक्कामोर्तब केलं आहे.
नेमकं काय काय स्वस्त झालंय?
नवीन जीएसटी कर रचनेचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला, विकासकांना आणि घर खरेदीदारांना होणार आहे. बांधकाम साहित्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा सिमेंटवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यामुळे सिमेंटचे दर गगनाला भिडलेले. आता मात्र सिमेंटच्या दरात घट होणार आहे. सिमेंटवरील 28 टक्के जीएसटी कर कमी करून तो 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल, ग्रॅनाईटवर 12 टक्के जीएसटी कर लागत होता पण आता तो 5 टक्के करण्यात आला आहे. वाळू, वीटांवरील कर 12 टकक्यांवरुन 5 टक्के, फरशी, भिंतीवरील आवरणे, लाकूड यांच्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर तर अक्षय ऊर्जा उपकरणांवरील कर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आला आहे. सिमेंट,वाळू,वीटा, फरशी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील जीएसटी कर कमी करण्यात आल्याने या बांधकाम साहित्यांच्या दरात कपात होणार असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.