महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर | राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. यामध्ये कोल्हापूरातील १७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाना भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे.
शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटलंय की, शिष्यवृत्ती बंदच्या निर्णयाला विरोध आहे. ती पूर्ववत सुरू करावी. याबाबत १५ दिवसांत शासनाने बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी. असे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने आज येथे दिला.
सारथी संस्थेमार्फत आठवीमध्ये NMMS परीक्षेत उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जायची. त्यांना महिन्याला नऊशे रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जात होते. चार वर्षांसाठी हे पैसे मिळत होते. मात्र, ही शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले. यावेळी वसंतराव मुळीक, शैलेजा भोसले आदी उपस्थित होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन त्यांना त्रास होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.आतपर्यंत शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती देणे गरजेचे होते. मात्र, सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शासनाच्या या एकतर्फी निर्णयातून काय साध्य केले, असा प्रश्न मुळीक यांनी उपस्थित केला आहे.