महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर | औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रयत्नांना गती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणला नुकतीच भेट देऊन अतिक्रमणांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने बाह्य वळण रस्त्यासाठी जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून या महिन्यात प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल.
चाकणमधील कोंडी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर समस्या बनली आहे. स्थानिक नागरिक, कामगार आणि उद्योग क्षेत्राने याकडे वारंवार लक्ष वेधले आहे, मात्र वेगवेगळ्या यंत्रणांनी हा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर अखेर यास गती मिळाली. सध्या औद्योगिक वाहने, कंटेनर आणि मालवाहतूक वाहनांमुळे प्रचंड कोंडी निर्माण होते. याचा स्थानिकांना बराच त्रास होतो.
चाकण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प कार्यरत आहेत, परंतु वाहतूक कोंडीमुळे मालवाहतुकीला विलंब होतो. त्यामुळे उत्पादन व पुरवठा साखळीवर परिणाम होतो. बाह्य वळण रस्ता तयार झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे उद्योगांना गती मिळेल आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, असे मत अधिकारी व्यक्त करत आहे.
चाकण येथील बाह्य वळणासाठी १४ हेक्टर जागेची मोजणी या महिन्यात सुरुवात होईल. मोजणीचे शुल्क भरले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत मोजणीच्या तारखा निश्चित करून सर्वेक्षण सुरू होईल. यामुळे या चार गावांतून महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन संभाव्य वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल.
– आशा जाधव, अधीक्षक, भूमी अभिलेख, पीएमआरडीए
मोजणी होणारे क्षेत्र
मेदनकरवाडी ६ हेक्टर
कडाचीवाडी ३ हेक्टर
नाणेकरवाडी २ हेक्टर
खराबवाडी २ हेक्टर