महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर | गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. शहरात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने रविवारी (ता. १४) ‘यलो’ ॲलर्ट देण्यात आला आहे.
शहर आणि परिसरात शनिवारी (ता. १३) दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांत कमाल तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘खडकवासला’तून २,९६८ क्युसेकने विसर्ग
खडकवासला : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाणी सोडणे मंगळवारी (ता. ९) रात्री आठ वाजता बंद केले होते. त्या दिवसापासून पावसालाही विराम मिळाला होता. मात्र, धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी (ता. १३) सायंकाळी सात वाजता २,९६८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला, असे मुठा कालवा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले.