महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २० जानेवारी |डोनाल्ड ट्रम्प म्हणजे जागतिक राजकारणातील अनपेक्षित वादळ. कधी टाळ्यांचा कडकडाट, तर कधी मुत्सद्देगिरीचा धक्का! ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या उभारणीत अमेरिकेने पुढाकार घेतला, त्याच संस्थांना आज ट्रम्प बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.—“हे नेतृत्व आहे की रुसलेपण?” ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा नारा देताना ट्रम्प विसरतात की अमेरिका मोठी झाली ती एकटीने नव्हे, तर जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहून. आज मात्र तेच केंद्र ढासळवण्याचं काम अमेरिका स्वतः करत आहे.
अमेरिकेची लष्करी ताकद अबाधित ठेवणं हे प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचं ध्येय असतंच. ट्रम्प त्याला अपवाद नाहीत. पण प्रश्न ताकदीचा नाही; प्रश्न तिच्या वापराचा आहे. बहुपक्षीय मंचांवर अविश्वास, आंतरराष्ट्रीय सहकार्याला दुय्यम वागणूक आणि “आम्ही, आधी आणि फक्त आम्ही” ही भूमिका—यामुळे जागतिक संतुलन बिघडतंय.—“हातात हातोडा असेल, तर प्रत्येक समस्या खिळ्यासारखीच दिसते!” ट्रम्प यांची परराष्ट्र नीती ही सामंजस्यापेक्षा दबावावर, तर संवादापेक्षा माघारीवर आधारित दिसते.
हवामान बदलाच्या मुद्द्यावर तर अमेरिकेने अक्षरशः पाठ फिरवली आहे. यूएनएफसीसीसी, आयपीसीसीसारख्या संस्थांमधून माघार घेणं म्हणजे वैज्ञानिक वास्तवाकडे डोळेझाक. तापमानवाढ दोन अंशांच्या आत रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना हा जबर धक्का आहे. लहान, गरिब देशांमध्ये काम करणाऱ्या महिला-बाल आरोग्य संस्थांचा निधी आटणार—हे ट्रम्प यांच्या निर्णयाचं थेट फलित. “जागतिक तापमान वाढतंय, पण अमेरिकेचं संवेदनशीलता थंडगार आहे,” असं . तात्कालिक राजकीय फायदा साधताना भविष्यातील आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक नुकसान दुर्लक्षित केलं जात आहे.
वास्तव हे आहे की ट्रम्प जागतिक व्यवस्थेला पर्याय देत नाहीत—ते फक्त पोकळी निर्माण करतात. आणि जिथे पोकळी असते, तिथे कुणीतरी ती भरतो. आज चीन शांतपणे ती जागा घेताना दिसतो. संयुक्त राष्ट्रांपासून दूर जाणं म्हणजे अमेरिकेचं वर्चस्व वाढणं नाही, तर तिचं एकाकीपण वाढणं आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणता म्हणता ‘अमेरिका अलोन’ होण्याचा धोका आहे—“जगाला सोबत घेऊन चालणं म्हणजे नेतृत्व; आणि जगाला दूर लोटणं म्हणजे अस्वस्थतेचं आमंत्रण!”
