![]()
महाराष्ट्र 24 : ऑनलाईन: विशेष प्रतिनिधी : दिनांक 20 जानेवारी : पिंपरी (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, मोरवाडी) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात दर रविवारी होणाऱ्या अखंडित साप्ताहिक पूजेच्या निमित्ताने एक अर्थपूर्ण व सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम पार पडला. स्मारक व जयंती उत्सव समितीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेविका श्रीमती अनुराधा (आई) गोरखे, सौ. सुप्रियाताई चांदगुडे तसेच नगरसेवक श्री. कुशाग्र कदम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा असलेले फोटोफ्रेम सन्मानपूर्वक भेट देण्यात आले. समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या स्मारकात झालेला हा सत्कार केवळ औपचारिक न राहता सामाजिक जाणीव जागवणारा ठरला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक कुशाग्र कदम यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “धनगर समाजाच्या हितासाठी लागेल ती मदत आम्ही नक्की करू. मग तो प्रश्न धनगर आरक्षणाचा असो वा स्मारकाच्या विकासाचा—समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमास साप्ताहिक पूजेचे प्रमुख दीपक भोजने, महावीर काळे, सुधाकर अर्जुन, विजय महानवर, सुमेध कावळे, विजय अर्जुन, महेश भोजने, सुभाष हाके, देवराम बिरगड, संभाजी लासके, अदिनाथ यमगर, निलेश वाघमोडे, नागनाथ वायकुळे, विनोद बरकडे, सागर वायकुळे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोकांच्या स्मारकात झालेला हा सत्कार कार्यक्रम समाज–प्रतिनिधी यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा ठरला.

