महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | इथेनॉल ब्लेंड फ्यूलची (ई- २० पेट्रोल) सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचा समावेश असणारे पेट्रोल विकणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर बरेच लोक शंका घेत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान, आता यावर नितीन गडकरी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या बुद्धीची प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. शनिवारी (१३ सप्टेंबर) नितीन गडकरी अँग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे मला माहिती आहे. विदर्भात साधारण १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्ये केल्या आहेत. ही बाब फारच लाजीरवानी आहे. या देशातला शेतकरी जोपर्यंत समृद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच राहतील,” असे नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी स्वतः वापरात असलेल्या इनोव्हा वाहनांची माहिती देत सांगितले की हे वाहन इथेनॉलवर चालते. या वाहनात पेट्रोलच्या तुलनेत निम्माच प्रति किलोमीटर इंधन खर्च आहे. त्यामुळे हे इंधन एकीकडे प्रदूषण कमी करत असताना दुसरीकडे खर्चही कमी करते. सोबत हे इंधन शेतकऱ्यांच्या शेतपिकाला जास्त दर मिळवून देत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
न्यायालयाने फेटाळली याचिका, आक्षेप काय होता?
पेट्रोल पंपांवर इथेनॉल ब्लेंड फ्यूल अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी फेटाळण्यात आली. ही याचिका इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या विरोधात नाही. ग्राहकाच्या आवडीचा अधिकार आणि निवड करण्याचा पर्याय शाबूत राहावा यासाठी ही याचिका करण्यात आली आहे, असा दावा याचिककर्त्यांच्या वकिलांनी केला होता. ई- २० पेट्रोल हे २०२३ सालानंतर निर्मिती करण्यात आलेल्या वाहनांसाठीच अनुकूल आहे. २०२३ सालाच्या पूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या वाहनांचे यामुळे नुकसान होईल असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळली आहे. त्यानंतर आता सरकारच्या इथेनॉल ब्लेंडेड प्रोटलविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दलाली करत नाही…
मी दलाली करत नाही, मी फसवणूक करत नाही. मला प्रामाणिकपणे कसे कमवायचे हे माहित आहे. मी माझ्या मुलांना कमाईच्या कल्पना देतो. माझ्या मुलाने इराणहून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली, असेही गडकरी म्हणाले.