महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी संध्याकाळपासून महाराष्ट्रासह मुंबईत जोरदार वर्षाव सुरू झाला. 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री मेघगर्जनेसह तीव्र पाऊस सुरु झाला. शहर आणि उपनगरांच्या बहुतांश भागांना पावसाने झोडपून काढले, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली. या पावसामुळे शाळा, महाविद्यालये आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला, तर पुण्यातही रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला. याचा शाळांवर काय परिणाम झाला? जाणून घेऊया.
पावसाचा वाढता जोर आणि धोका
मुंबई आणि उपनगरांत पहाटेपासून पावसाचा वेग वाढला असून, काळ्या ढगांनीआकाश व्यापले आहे. आगामी तासांत वर्षावाचा प्रचंड जोर राहण्याची शक्यता असल्याने पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे. यंत्रणा अलर्टवर असून, अंधेरी, नवी मुंबईसह पश्चिम उपनगरांत परिस्थिती गंभीर आहे. हा जोर कायम राहिल्यास अतिरिक्त उपाययोजना करण्यात येतील.
वाहतूक व्यवस्था कोलमडली
मुसळधार पावसाने मुंबईची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सायन ते दक्षिण मुंबई मार्गावर वाहनांची गर्दी, दादर येथे रस्त्याच्या कडेला पाणी साचले, तर कुर्ला, वांद्रे, खांदेश्वर स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी आले. लोकल ट्रेनचा वेग १० मिनिटे मंदावला, तर मध्य आणि हार्बर लाईनवर उशीर झाला. वडाळ्यात मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे थांबली, ज्यामुळे प्रवाशांना त्रास झाला.
अंधेरीत पाणी साचलं
अंधेरी सबवे येथे १ ते १.५ फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आणि गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आले. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदार वर्गाची कोंडी झाली असून, प्रशासनाने जास्त वेळ घेऊन घराबाहेर पडण्याचे आणि शक्य असल्यास घरी राहण्याचे आवाहन केले आहे. या पावसाने मुंबईकरांच्या दैनंदिनाला आव्हान दिले असून, सतर्क राहण्याची गरज आहे.
पुण्यात काही ठिकाणी शाळांना सुट्टी
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. हडपसरसह विविध भागांत स्थानिक प्रशासनाने झाडपड आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला. मुंबईतही उपनगरांतील शाळांना सुट्टी देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. हा निर्णय पावसाच्या तीव्रतेवर आधारित असून, यामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला. 15 सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100-150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईत शाळा सुरु
मुंबईतही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. असे असले तरी मुंबईतील विविध भागात सकाळच्या सत्रातील शाळा वेळेत सुरु झाल्या. दरम्यान असाच पाऊस सुरु राहिला तर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत दादरच्या बालमोहन शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळी भरलेल्या शाळा लवकर सोडल्या आहेत.