Global Warming: पृथ्वीची अदृश्य ढाल झिजतेय! तापमानवाढीच्या ज्वाळांत ओझोनचं कवचही धोक्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च २०२६ ।। मानवाच्या प्रगतीच्या रथाला वेग आला, पण त्या वेगाच्या चाकाखाली निसर्गाची हिरवी शाल चिरडली जाऊ लागली, ही वस्तुस्थिती आज कुणी नाकारू शकत नाही. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे औद्योगिकीकरण, जीवाश्म इंधनांचा वाढता वापर, जंगलतोड आणि प्रदूषण यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ. त्याचे परिणाम जगभर स्पष्ट दिसू लागले आहेत—अत्यंत उष्ण लाटा, अनियमित पर्जन्यमान, वितळणारे हिमनद आणि वाढती समुद्रपातळी. या तापमानवाढीच्या संकटात भर घालणारे आणखी एक गंभीर संकट म्हणजे पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक संरक्षणकवच समजला जाणारा ओझोन थर विरळ होणे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या या थराला पडलेली छिद्रे पर्यावरणासाठी इशारा देणारी घंटा ठरत आहेत.

ओझोनचा शोध १८४० साली जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञ Christian Friedrich Schönbein यांनी लावला. वातावरणातील तपांबर (ट्रोपोस्फिअर) आणि स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) या दोन थरांमध्ये ओझोन आढळतो. एकूण ओझोनपैकी सुमारे ९० टक्के ओझोन स्थितांबरात असून १५ ते ३५ किलोमीटर उंचीवर तयार होणारा हा थर पृथ्वीचा ‘अदृश्य ढाल’ म्हणून कार्य करतो. ऑक्सिजनच्या रेणूंचे सौरप्रारणांमुळे विघटन होऊन तयार झालेल्या अणूंच्या संयोगातून ओझोन (O₃) तयार होतो. हा वायू सूर्याच्या घातक अतिनील किरणांना शोषून घेतो आणि त्वचारोग, डोळ्यांचे विकार तसेच त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करतो. मात्र जमिनीलगत तयार होणारा ओझोन हा नायट्रोजन ऑक्साईड्स आणि इतर प्रदूषकांच्या अभिक्रियेतून निर्माण होतो आणि तो श्वसनविकारांना कारणीभूत ठरतो. क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs) सारख्या मानवनिर्मित रसायनांमुळे स्थितांबरातील ओझोनचे रेणू तुटू लागतात आणि त्यामुळे ओझोन थर विरळ होतो.

ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन ऱ्हास या दोन स्वतंत्र समस्या वाटल्या तरी त्यांची मुळे मानवी क्रियांमध्येच आहेत. हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे तापमान वाढते, तर CFCs आणि हॅलोन्ससारख्या वायूंमुळे ओझोन थराला तडा जातो. १९८७ मध्ये झालेल्या Montreal Protocol मुळे ओझोन-क्षयकारी पदार्थांवर निर्बंध आले आणि काही प्रमाणात सुधारणा दिसू लागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार ओझोन थराची पुनर्प्राप्ती पुढील काही दशकांत शक्य आहे, आणि त्यातून जागतिक तापमानवाढ सुमारे ०.५ अंश सेल्सिअसने कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. तथापि, हवामान बदलामुळे वातावरणातील रासायनिक प्रक्रिया बदलतात आणि त्यामुळे ओझोनच्या पुनर्बांधणीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या दुहेरी संकटावर मात करायची असेल, तर हरितगृह वायूंचे नियंत्रण, स्वच्छ ऊर्जा वापर आणि पर्यावरणपूरक धोरणांची काटेकोर अंमलबजावणी हाच एकमेव शाश्वत मार्ग ठरतो. पृथ्वीची ही अदृश्य ढाल वाचवणे म्हणजे आपल्या भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *