महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | आशिया चषकाच्या स्पर्धेत काल (18 सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने विजय मिळत सुपर-4 मध्येही प्रवेश केला. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीलंकेचा गोलंदाज दुनिथ वेल्लालगेच्या (Dunith Wellalage) वडिलांचे हार्ट अटॅकनं निधन झालं आहे. एका षटकात 5 षटकार ठोकले गेल्यानं दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं बोललं जात आहे. वेल्लालगेचे वडील श्रीलंकेतल्या कँडीत टीव्हीवर सामना पाहत होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी फलंदाजी करत असताना डावातील शेवटचे षटक दुनिथ वेल्लालगे टाकले. दुनिथ वेल्लालगेच्या या शेवटच्या षटकात मोहम्मद नबीने 32 धावा लुटल्या. यामध्ये तब्बाल 5 षटकार मोहम्मद नबीने टोलावले. आपल्या मुलाच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले गेल्याचं वेल्लालगेच्या वडिलांना ते सहन झालं नाही. त्यानंतर दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं बोललं जात आहे.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣
– 5 sixes in an over by a 40 year old Mohammad Nabi in Asia Cup 2025. 🤯pic.twitter.com/U5cnY0mr3y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 18, 2025
नेमकं काय घडलं?
खरंतर अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी केली होती आणि 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या होत्या. सामन्यात अजून चुरसही निर्माण झाली नव्हती. पण आपल्या मुलाच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले गेल्याचं वेल्लालगेच्या वडिलांना ते सहन झालं नाही आणि दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा सामना श्रीलंकेनं 8 चेंडू आणि 6 गडी राखून जिंकला आणि सुपर फोरमध्ये प्रवेशही केला. पण हा विजय पाहायला दुनिथ वेल्लालगेचे वडील जिवंत नव्हते. मोहम्मद नबीला ही वार्ता कळताच तोही काही काळ स्तब्ध होऊन गेला.
मोहम्मद नबीने घातला धुमाकूळ-
अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या. यावेळी त्याने दुनिथ वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला.
श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर विजय
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले आणि विजय मिळवला. त्याने 52 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. कुसल परेराने 20 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा केल्या. कामिंदू मेंडिसने 13 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, मोहम्मद नबीच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान 169 धावा करू शकला.
सुपर-4 चं समीकरण ठरलं-
भारत आणि पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये ग्रुप अ मधून आधीच पात्रता मिळवली होती. त्यानंतर ग्रुप ब मधून श्रीलंका आणि बांगलादेशचा संघ सुपर-4 मध्ये दाखल झाला.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश
25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
28 सप्टेंबर – अंतिम सामना