महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | म्हाडाच्या कोकण मंडळाने २००० साली काढलेल्या लाॅटरीत ठाणे चितळसर येथील घरांसाठी विजेते ठरलेल्या विजेत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १५६ विजेत्यांना सुमारे ५० लाख रुपये किमतीचे घर अवघ्या ३६ लाख रुपयांत मिळणार आहे.
म्हाडाच्या लॉटरीमध्ये विजेते ठरूनही जवळपास २५ वर्षे घरासाठी प्रतीक्षा करावी लागली असून तेव्हाच्या आणि आताच्या घराच्या किमतीत मोठी तफावत आहे. त्यामुळे म्हाडाकडून संबंधित विजेत्यांचा सहानुभूतीने विचार केला जात असून त्यांना २०२१ची या घरांची सुमारे ३१-३२ लाख रुपये आधारभूत किंमत मानून आणि त्यावर किरकोळ व्याज आकारून ३६ लाख रुपये एवढ्या किमतीत घरे देण्याच्या म्हाडाकडून हालचाली सुरू आहेत. त्यामुळे संबंधित विजेत्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाने २००० मध्ये काढलेल्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील २०० घरांचा समावेश होता. त्यानुसार अर्ज केलेल्या १५६ जणांना येथील योजनेमध्ये घरे लागली खरी; पण या भूखंडावर आरक्षण असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती.
दरम्यान, म्हाडाच्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे ते घराच्या प्रतीक्षेत होते; मात्र म्हाडाने आता चितळसर येथे सुमारे १,१०० घरे उभारली आहेत. त्यामुळे तत्कालीन संबंधित लाॅटरी विजेत्यांना त्यामध्ये राखीव घरे ठेवली आहेत; मात्र किमती आवाक्याबाहेर असल्याने विजेत्या अर्जदारांनी किमती कमी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हाडाकडे केली आहे.