महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभर गोपीचंद पळकर यांच्याविरोधात जोरदार आंदोलनं केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करून सल्ला दिला. तरी देखील पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘पंतप्रधानांच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का? त्यामुळे माफी मागायचा काय विषय येत नाही. ‘
जयंत पाटील यांच्यावरील गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टिकेचे मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करत सल्ला दिला. यापुढे अशा टीका न करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना देण्यात आल्या. तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा यापुढे पालन करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्यावरील जहरी टिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना सबुरीचा सल्ला दिला.