महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ सप्टेंबर | घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सामान्यांसाठी कायम सज्ज असते. म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर होताच, त्याच्या किंमती जास्त असल्याची तक्रार सर्वसामान्यांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर म्हाडा आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. म्हाडाच्या घरांच्या किमतीत आठ ते दहा टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.
म्हाडाची घरे जाहीर होताच सामान्यांकडून घरांच्या किंमतींबाबत तक्रारी म्हाडाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अनावश्यक घटकांवर कात्री लावण्यासाठी म्हाडानं समिती नेमली. या समितीचा अहवाल सादर करून म्हाडाच्या घरांच्या किंमतीत ८ ते १० टक्क्यांची घट होणार असल्याची माहिती आहे.
म्हाडाच्या समितीनं तयार केलेल्या अहवालानुसार, रेडिरेकनर दराशिवाय इतर खर्च घटकांचा विचार करून घरांच्या किंमतीत ८ ते १० टक्क्यांची कपात करता येऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. या समितीचा अहवाल आठवडाभरात म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला जाणार आहे.
सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील असते. दरम्यान, म्हाडानं घरांच्या किंमती ठरवताना रेडिरेकनर दराव्यतिरिक्त प्रशासकीय खर्च ५ टक्के, बांधकाम साहित्याच्या किंमतीत होणारी पाच टक्के वाढ, जमीन घेण्यावरच्या व्याजाची रक्कम आणि बांधकाम शुल्क यांचा समावेश केला जातो. या सर्व घटकांचा एकत्रित विचार केल्यामुळे घरांच्या किमती १० ते १५ टक्क्यांहून अधिक वाढलेल्या आहेत.
समितीच्या अहवालानुसार या अनावश्यक खर्च घटकांचा समावेश कमी केल्यास सामान्य नागरिकांसाठी घरांची किंमत अधित परवडणारी होईल.