महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ सप्टेंबर – चीनला लागून असलेल्या सीमेवर पुन्हा वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.सीमेवर चीनचा धोका लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखचा दौरा करून लष्कराच्या तयारीचा आढाव घेतला.
त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि प्रत्येक्ष सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेत त्यांचं मनोधैर्य वाढवलं.तिकडे चिनी सैनिकांच्या हालचालीही वाढल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत मात्र चीनच्या उचापती थांबलेल्या नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणाव असून चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.