महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | लाडकी बहीण योजना आता डोकेदुखी ठरत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य केली आहे. E-KYC करताना अनेक अडचणी देखील येत आहेत. आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपी येत नाही. ओटीपी आला तर उशिरा येतो. मोबाईलमध्ये ओटीपी टाकण्यासाठी पर्यायदेखील दिसत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे. हिंगोलीतील अनेक गावांतील शेकडो महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाब विचारण्यासाठी आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचा अचानक लाभ बंद
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा अचानक लाभ बंद करण्यात आल्याने हिंगोलीतील अनेक गावांतील शेकडो महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाब विचारण्यासाठी पोहोचल्या. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील तपवन व आजारसोंडा गावातील महिलांची संख्या जास्त होती. दरम्यान, सरकारने निवडणुकीआधी एखाद्या कोंबडीला दाणे टाकावे तसे लाडक्या बहिणींना लाभ दिला; मात्र हीच लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का, असा सवाल या महिलांनी जिल्हा प्रशासनाला केला.
लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केला
“आमच्या घरी गाडी नाही, मोठे वाहन नाही. आम्ही सरकारच्या सर्व निकषांमध्ये बसतो, तरीदेखील आमचा लाभ बंद केला आहे,” असे सांगत या लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, e-KYCची सर्व कागदपत्रे सोबत घेऊन आलेल्या लाडक्या बहिणी तब्बल तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात थांबल्या होत्या. शासनाचे प्रतिनिधी योग्य उत्तर देत नसल्याने अखेर या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा आपल्या घरी परतल्या.
अशावेळी काय करावे?
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळाले नसतील, तर तुमच्या अर्जाच्या मंजुरीची स्थिती तपासा. तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे आणि आधार तपशील योग्यरित्या अपडेट केले आहेत याची पडताळणी करा. तसेच जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा. E-KYC करताना देखील तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे स्पष्ट होते.
E-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. तिथं तुम्हाला e-KYC बॅनर दिसेल. ज्यावर क्लिक केल्यावर e-KYC फॉर्म उघडतो. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यांनतर Captcha Code टाका आणी सेंड ओटीपीवर क्लिक करा. लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करा. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच Captcha Code टाका. आणि Send OTP वर क्लिक करा. यापूर्वी तुम्हासा संमती देखी द्यायची आहे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याने आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागती.
१. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. २. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.