महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. मागील काही आठवड्यांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अमेरिकेने भारतावर टॅरिफ आकरण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली. या मूळ निर्णयानंतर आठवड्याभरातच ट्रम्प यांनी टॅरिफ आणि दंड असा एकूण 50 टक्के कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यानंतरही भारताने अगदी संतापून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
राजनाथ यांनी सांगितलं कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या मालावर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारत सरारकडून यावर लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. भारताने परिस्थिती अगदी संयमाने हाताळली. मात्र भारत यावर लगेच का व्यक्त झाला नाही याबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे. आपला देशाचे विचार आणि हृदय मोठे असल्याचे सिंह यांनी म्हटलं आहे.
Delighted to interact with the Indian community in Rabat. Lauded their hard work and dedication that defines the Indian community across the world. It is praiseworthy, how they are contributing to Morocco’s progress and at the same time remain connected to their roots in India. pic.twitter.com/rJYwuXNpyw
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 22, 2025
राजनाथ नेमकं काय म्हणाले?
मोरोक्को येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांनी भारतावर कर लादल्यानंतर नेमकं काय झालं यासंबंधी भाष्य केले आहे. “आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. ज्यांचे विचार मोठे असतात, मन मोठे असते ते कोणत्याही घटनेवर लगेचच प्रतिक्रिया देत नाहीत,” असं राजनाथ सिंह म्हणाले. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय मालावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे, ज्यापैकी 25 टक्के टॅरिफ हा रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने लादण्यात आला आहे.
पाकव्याप्त काश्मीरबद्दल संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
भारताचे संरक्षणमंत्री हे सध्या मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्याने यावेळी कोणतेही आक्रमक पाऊल न उचलता पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा ताबा पुन्हा भारताला मिळेल याबद्दल देखील विश्वास व्यक्त केला. सध्याच्या राजवटीतून लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. 7 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पीओके ताब्यात घेण्याची संधी गमावली असा आरोप झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हे विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने अनेक पाकिस्तानी विमाने पाडल्यानंतर भारताची बाजू मजबूत असतानाही शस्त्रविराम करण्यावर सहमती दाखवण्यात आली, यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली गेली होती. तसेच ही पीओके ताब्यात घेण्याची संधी होती असेही विरोधकांनी म्हटले होते.