महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर | सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने माढा तालुक्यात मोठा पूर आला आहे. माढ्यातील, रिधोरे येथील आणि सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाच्या खालून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत आहेत.
सीना नदीच्या पुराचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला असून रेल्वे आणि रस्ते प्रवासी वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
लातूर-मुंबई ही ट्रेन 3 तास उशिराने धावली, तर नांदेडहून 23 सप्टेंबर 2025 रोजी निघणारी व पनवेलहून 23 सप्टेंबर 2025 रोजी निघणारी नांदेड – पनवेल – नांदेड एक्सप्रेस बार्शीमार्गे न जाता अहिल्यानगर मार्गे धावली.
दुसरीकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गही प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. याठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग प्रवाशांना बंद केल्याने प्रवासी चांगलेच ताटकळले होते.
सीना नदी पात्राची पातळी वाढल्याने काल रात्री 11 वाजल्यापासून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. त्यामुळे, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी खोळंबून पडले आहेत.
दरम्यान, पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या काही प्रवाशांना आता पोलीस प्रशासनाने पायी पूल ओलांडण्याची परवानगी दिली. त्यामुळे, पुण्याहून सोलापूरकडे पायी येणाऱ्या प्रवाशांनी पुलावरुन धाव घेत पुल ओलांडला आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ते सावळेश्वर टोल नाकापर्यंत 3-4 किलोमीटर रांगा लागल्याचं चित्र होतं. केवळ रुग्णवाहिकाना दुसऱ्या बाजूने सोडण्यात आल्या.
दरम्यान, निदान पायी पूल ओलांडण्यासाठी परवानगी मिळाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला असून आपल्या गावी, नातेवाईकांच्या भेटीची ओढ लागलेले प्रवासी आता घराकडे रवाना झाल्याने आनंदित झाल्याचंही दिसून आलं.