महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | Donald Trump Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कातंत्र सुरूच असून आता त्यांनी आयात केलेल्या ब्रँडेड औषधांवर १०० टक्के टॅरिफ लादण्याची नवी घोषणा केली आहे. औषधांबरोबरच अवजड ट्रकवर २५ टक्के तर स्वयंपाकघरातील कॅबिनेटवर ५० टक्के टॅरिफ लादणार असल्याचे त्यांनी म्हटले.
“जोपर्यंत औषध कंपनी त्यांचे उत्पादन अमेरिकेत घेत नाही, तोपर्यंत आम्ही आयात केलेल्या कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केल्या औषधावर १०० टक्के टॅरिफ लादणार आहोत. १ ऑक्टोबर २०२५ पासून याची सुरुवात होईल”, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर लिहिली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, पुढील आठवड्यापासून बाथरूम व्हॅनिटीजवर ५० टक्के आणि अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३० टक्के कर आकारण्यास सुरुवात करणार आहेत. सर्व नवीन कर १ ऑक्टोबरपासून लागू होतील.
आयात केलेल्या औषधांवर आता १०० टक्के टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
तसेच अवजड ट्रकवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले की, बाहेरील देशांची अयोग्य स्पर्धा टाळून देशातील उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पॅकारच्या मालकीच्या पीटरबिल्ट आणि केनवर्थ आणि डेमलर ट्रकच्या मालकीच्या फ्रेटलाइनरसारख्या कंपन्यांना फायदा होईल, असे सांगितले जाते.
स्वयंपाकघर, बाथरूम आणि काही फर्निचरवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादल्याबद्दलच्या निर्णयाची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात आयात होत असून याचा तोटा स्थानिक उत्पादकांना सहन करावा लागत आहे. बाहेरच्या देशांमधून या वस्तूंचा जणू पूरच येत आहे. त्यासाठी हे टॅरिफ लावण्यात येत आहे.
भारतावर परिणाम होणार?
भारतातील औषधनिर्मिती क्षेत्रातील अनेक उत्पादने अमेरिकेन बाजारपेठेत निर्यात होतात. एनडीटीव्हीने फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या आकडीवारीचा हवाला देत म्हटले, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने २७.९ अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीची औषध उत्पादनांची निर्यात केली होती. यातील ३१ टक्के म्हणजे ८.७ अब्ज डॉलर्सची निर्यात एकट्या अमेरिकेत करण्यात आली होती.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भारत अमेरिकेत ४५ टक्क्यांहून अधिक जेनेरिक आणि १५ टक्क्यांहून अधिक बायोसिमिलर औषधांचा पुरवठा करतो. भारतातील अनेक मोठ्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या एकूण उत्पन्नाच्या ३०-५० टक्के उत्पन्न अमेरिकन बाजारपेठेतून मिळवतात.
अमेरिकेने लादलेले नवे टॅरिफ हे प्रामुख्याने ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधांना लागू करण्यात येणार आहे. अशी औषधे काही निवडक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून उत्पादित केली जातात. भारतातील जेनेरिक आणि विशेष औषधांवर याचा किती परिणाम होईल, ये काही दिवसात कळेल.