महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीच्या हालचालींना वेग. मराठवाडा, धाराशिव भागांमध्ये आलेल्या पुरानं सबंध महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं. पोशिंद्याची अर्थात बळीराजाची दयनीय अवस्था पाहून अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशीच विनवणी अनेकांनी केली. राज्यातील या अतिशय भयावह पूरस्थितीला अनुसरून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. शेतक-यांना भरीव मदत मिळावी यासाठी ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
महाप्रलयामुळे मराठवाड्यासह राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती फडणवीस केंद्रातील नेत्यांना देतील आणि राज्यासाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न करतील. दरम्यान गुरुवारी (25 सप्टेंबर 2025) मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना एक निवेदन दिलं असून संकटात सापडलेल्या शेतक-यांना NDRFच्या निधीतून भरीव मदत देण्याची मागणी केली होती. इथं मुख्यमंत्री दिल्लीहून नेमकी किती मदत आणतात हा चर्चेचा विषय असला तरीही त्याआधी, महापुरानं कोलमडलेल्या मराठवाड्याला फडणवीस सरकारनं मदतीचा हात दिला आहे.
अतिवृष्टी आणि महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. पूरामुळं प्रभावित जनावरासाठी 37 हजार रुपये तर शेळी-मेंढ्यांसाठी 4 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. सदर परिस्थितीसंदर्भात पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
राज्य सरकारनं आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच्या हालचालींना वेग दिला असून, विरोधकांची यावर नेमकी काय भूमिका असेल हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला फक्त शासन स्तरावरच नव्हे, तर विविध स्तरांवरून मराठवाड्यातील या शेतकऱ्यांसाठी असंख्य मदतीचे हात पुढे येत असून, सामान्य नागरिकांनाही ही मदत करता येणार आहे.