महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग आणि भारताचं नंदनवन म्हटलं जातं. याच काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानच्या हद्दीत असून त्याचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केला जातो. सध्या मात्र या स्वर्गाहूनही सुंदर भूमीवर तणावाचे ताशेरे पाहायला मिलत असून, इथं उठावाचे वारे स्वैर होताना दिसत आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये PAK सैन्याविरोधात पुन्हा एकदा बंडाचे वारे वाहू लागले असून, नागरिक सैन्यदलाविरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शनं करताना दिसत आहेत. याच जनतेचं बंड हाणून पाडण्यासाठी शहबाज शरीफ यांनी लष्करी तुकड्यांचा वापर केल्याचं म्हटलं जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या नागरिक, ‘सहन नाही करणार…’, ‘आमचा हक्क मिळवणार…’ अशा घोषणा देत असून, जनतेच्या या मागण्यांसंदर्भातील नेतृत्त्वं येथील ‘जॉईंट आवामी कमिटी’ करत आहे. सध्याचा तणाव पाहता या समितीनं विरोधाचं प्रतीक म्हणून 29 सप्टेंबर रोजी पीओकेमध्ये संपूर्ण टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
असहकार….लॉकडाऊन…. PoK धुमसतंय!
मागील काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असून, अतिशय गंभीर स्वरुपातील निदर्शनं सुरू आहेत. काही धास्तावणाऱ्या घोषणा केल्या जात आहेत. गरिबी, भूक आणि अपमानास्पद वागणुकीमुळं त्रस्त असणाऱ्या या पाकल्याप्त काश्मीरमधील जनता सध्या इतकी अडचणीत असल्याचं म्हटलं जात आहे की त्यांनी सैन्याच्या विरोधात लॉकडाऊन पुकारलं आहे.
मात्र, या जनतेची गळचेपी करण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनांना चिरडून टाकण्यासाठी शहबाज आणि मुनीर यांनी PoK ला ‘बूट- बुलेट’च्या स्वाधीन केलं आहे. येथील संवेदनशील भागांमध्ये निमलष्करी तुडक्यांची संख्या सातत्यानं वाढवली जात आहे.
पुढच्या 48 तासांमध्ये नेमकं काय होणार?
संपूर्ण पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याचीच चर्चा असल्याचं विश्वसनीय सूत्रांमार्फत सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीला PoKमधील जनतेनं शहबाज, मुनीर यांच्याविरोधात थेट युद्धाची भाषा केली आहे. ज्यामुळं आता लॉकडाऊनच्या घोषणेनंतर PoK मध्ये नागरिकांना अटक होण्याची, पोलिसांची धाड पडण्याची भीतीसुद्धा सतावू लागली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना होणाऱ्या विरोधाबाबत मात्र इथं दुमत नाही.
सदर विरोधाचं नेतृत्त्वं करणाऱ्या समितीकडून आपल्या मागण्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं परिस्थिती आणखी चिघळली, ज्यामुळं अडचणी वाढल्याचं सांगण्यात आलं. आपल्या नेत्यांना अटक झाली कर इथून पुढं दुसरी रणनिती अमलात आणण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती इतकी भीषण असल्याचं सांगण्यात येत आहे की येथील जनतेकडे पुरेसा अन्नसाठा नाही, हाताशी काम नाही, कमाईचं साधन नाही, उपचाराचं साधन आणि मार्ग नाही किंबहुना येथील जनतेकडे स्वातंत्र्यच नाही. याच मागण्यांसाठी येथील जनता सरकारविरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शनं करताना दिसत आहे. मात्र पाकचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यांनी मात्र या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुढच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडणार याकडे साऱ्यांचच लक्ष लागलेलं असेल.