महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विशेषतः आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयएमडीने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ आणि इतर विभागांसाठी ‘ऑरेंज ते येलो अलर्ट’ जारी केले आहेत. मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय.पुढील पाच दिवस धोक्याचे असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.
पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांचे आदेश. जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट . अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर
छत्रपती संभाजी नगरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, हवामान विभागाने वर्तविलेल्या संभाव्य पावसाची परिस्थिती व आज निर्माण झालेला पुराचा धोका लक्षात घेता, 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हे आदेश जारी केले आहेत.