नवरात्र आठवा दिवस – अकाल मृत्यूचे भय दूर करणाऱ्या कालरात्री देवीची महती; वाचा सविस्तर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | कालरात्री ही नवदुर्गांपैकी एक असून ती सातवी देवी आहे. यंदा 10 दिवस नवरात्र असल्याने यंदा आठव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करण्यात येणार आहे. ही देवी दुर्गेचे उग्र आणि भंयकर रूप आहे. रात्रीच्या अंधारात प्रकाशाचे तेज दाखवणारे तिचे स्वरुप आहे. तिच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. तिचे वाहन गाढव असून, तिचे भंयकर रूप असूनही ती भक्तांसाठी शुभंकरी आहे,ती सर्व राक्षसी शक्तींचा नाश करते. ती अकाल मृत्यूचे भय दूर करते आणि ती भक्तांना धैर्य व शौर्य देते, अशी मान्यता आहे.

कालरात्री देवीचा उल्लेख देवी महात्म्यात आढळतो. कालरात्री ही देवीच्या भंयकर रूपांपैकी एक आहे. नवरात्र उत्सवात कालरात्रीची पूजा केली जाते. नवरात्रातील 9 देवींपैकी ती सातवी देवी आहे. देवीचे हे रूप सर्व राक्षसी प्राणी, भूत, दुष्ट आत्मे आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे मानले जाते. कृष्णवर्णीय शरीर व तीन रक्ताळलेले डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, गाढव वाहन असलेली, गळ्यात कवटीचा हार, खड्ग धारण केलेली असे भयंकर स्वरूप देवीचे आहे. तिच्या चार हातात त्रिशूळ, तंतुवाद्य, वज्र आणि एक प्याला आहे.

कालरात्री देवी चतुर्भुज असून तिच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्रि देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी वीजेप्रमाणे चकाकणारी आहे. कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षता यांनी देवीचे पूजन करावे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.

देवी भागवत पुराणानुसार, कालरात्रि देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते, अशी मान्यता आहे. देवीचे स्वरुप भंयकर असल्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात. कालरात्रि देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *