महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. पण विजेत्या भारतीय संघाने मात्र आशिया चषकाची ट्रॉफी आज म्हणजेच विजयाच्या दिवशी घेण्यास मात्र नकार दिला आहे. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला.
भारताला आशिया कपची ट्रॉफी उचलण्यासाठी जवळपास तासभर प्रतीक्षा करावी लागली कारण पारितोषिक वितरण समारंभ उशिरा सुरू झाला. सामना संपल्यानंतर पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेरीस टीम इंडियाने ट्रॉफी समारंभातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यासह भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवची विजयानंतर मुलाखतही घेतली गेली नाही.
“एसीसीने मला कळवले आहे की भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिकं स्वीकारणार नाही. त्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो,” असे सूत्रसंचालक सायमन डुल म्हणाले. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकं घेतली, पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही.
सामना संपून जवळपास तासभर झाल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नव्हते. मोहसीन नक्वी यांना परिषदेच्या प्रोटोकॉलनुसार पारितोषिक वितरण करायचे होते, पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते. जवळपास ५५ मिनिटांनंतर अखेर सलमान आघा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले, मात्र त्यांचे स्वागत “इंडियाआ… इंडियाआ…” अशा जोरदार घोषणांनी झाले.
भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपलं नववं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यापूर्वीच चर्चा रंगल्या होत्या की, जर भारताने आशिया चषकाची ट्रॉफी पटकावली, तर भारतीय खेळाडू ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊ शकतात. कारण ट्रॉफी देणारे मोहसिन नक्वी असतील, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, पाकिस्तानचे गृहमंत्री आणि भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांत नक्वी यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर दोनदा गूढ व्हिडिओ मेसेज पोस्ट केले आहेत. त्या व्हिडिओत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा गोल सेलिब्रेशन दाखवण्यात आला आहे, ज्यात प्लेन क्रॅशची दिसत आहे. अगदी असाच इशारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने २१ सप्टेंबरला भारताविरुद्ध झालेल्या सुपर-४ सामन्यात वारंवार केला होता. त्याच कारणामुळे त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता.