सोन्याच्या तिजोरीवर कुलूप, पण बँकेसमोर रांग! वर्षात १२७% उसळी; अर्थकारणाचा इशारा की आपत्कालीन सवय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च २०२६ ।। भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नव्हे, तो घरातील निःशब्द बँकच! पण आता या ‘घरगुती बँके’ची किल्ली थेट बँकांच्या तिजोरीत जाऊन पोहोचते आहे. देशभरात गोल्ड लोनसाठी ग्राहकांची रांग लागली असून एका वर्षात तब्बल १२७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. डिसेंबर २०२५ मध्येच २४,०६१ कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज घेण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही केवळ वाढ नाही; हा बदलता आर्थिक स्वभाव आहे. घरातील कडुलिंबासारखं जपलेलं सोनं आता तातडीच्या खर्चासाठी, EMI साठी, छोट्या-मोठ्या गरजांसाठी सहजपणे गहाण ठेवलं जातंय. “गरज पडली की सोनं आहेच!” ही मानसिकता आता सवयीच्या उंबरठ्यावर उभी आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या मासिक अहवालानुसार सोने तारण कर्जात वर्षभरात १२७ टक्क्यांची वाढ झाली आहे; आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाढ ८५.५ टक्के आहे. ३१ मार्चला २,०६,२८२ कोटी असलेली थकबाकी नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३,५८,६४५ कोटींवर पोहोचली आणि ३१ डिसेंबर २०२५ अखेर ३,८२,७०६ कोटींवर स्थिरावली. आकड्यांचा हा चढता आलेख सांगतो की गोल्ड लोन हा आता मर्यादित वर्गाचा पर्याय राहिलेला नाही. बँका आणि एनबीएफसी सोन्याची शुद्धता तपासतात, कागदपत्रांची कटकट कमी असते, CIBIL स्कोअरची फारशी अडचण नाही—म्हणून पैसे पटकन हातात. शिवाय २.५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी दागिन्यांच्या किमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंत रक्कम मिळते. क्रेडिट कार्डपेक्षा व्याजदर कमी—म्हणजे ‘सोनं ठेवा आणि समाधान घ्या’ अशीच जणू जाहिरात!

पण या चकाकीत सावलीही आहे. तज्ज्ञांच्या मते महागाईचा दबाव, रोजच्या खर्चाची टाचणी आणि सहज उपलब्धता यामुळे गोल्ड लोन आपत्कालीन निधीचा पर्याय बनत चालला आहे. छोट्या गरजांसाठीही लोक सोनं गहाण ठेवत आहेत—ही बाब चिंतेची. बचतीची सवय कमी आणि कर्जाची सोय जास्त, अशी समीकरणं तयार झाली तर घरगुती अर्थकारणाची कसरत वाढते. सोनं हे संकटात आधार असावं; सवयीचा आधार बनू नये. अन्यथा तिजोरीतलं वैभव कर्जाच्या कागदावर उतरलेलं दिसेल. सोन्याची चमक कायम राहो, पण ती विवेकाच्या प्रकाशात—हाच या वाढत्या ट्रेंडमधला खरा संदेश ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *